Saturday, 4 February 2017

आत्मदमन....
ओरखडे आणि नाविन्यपूर्णता,
ऊगीचच एकवार हसू लागतात.
वाळू आणि दुरावलेली वस्ती 
अजूनही संधी शोधत असतात.
आपण आपल्या मनाच्या पडद्यावर,
अनेक वर्षे स्मरणातल्या काही व्यथा
रेखाटतो कुचंबत पण हळुवारपणे.
अगदी अस्सल वाटतात ते उसने देखावे.
द्यूताच्या दिवसांच्या निमित्ताने कोणी बघितलं, की त्याचे डोळे आपोआपच उघडलेले असणार.
आता राहून गेलं होतं, कधीकाळी हसल्याबद्दलचं खोटं आणि वांझोटं देवपण.
अगदी अस्सल वाटले ते तसले धुमारे.
पण ते चिकटवले आहेत?
का ती आपल्या मनाच्या वेलीवर,
माखलेली रक्ताची शपथ!
पुन्हा एकदा तेच विखारी सुगंध,
पुढे दामटलेले बिभत्स पाश....
ओसंडून वाहणारे अश्लील शौर्य...
उगाच सरणावरून उठलो असे झाले.
बरी होती मरणानंतरची
भळभळती स्मृती.
खोटा का असेना,
दहशतीतूनच उभारलेला स्मृतिस्तंभ.
कावळा बनून काव्य रचायचं
आणि वखवखत पिंडावर तुटून पडायचं.
चलो,पिछे मुड...
उड उड उड....
ढॅण्टॅढॅण.......
.....रत्नकान्त नाईक.
आग..
शिरशिरणारे हलके अंग
आणिक वरुनी सरी
धुरकट मेघातून चालली
पहा कशी भरभरी.

आला वारा सोसाट्याचा
खोळ कशी सुटली
डोईवरली सुकी लाकडे
त्यामुळेच भिजली.
अनवाणी पायांनी चालत
वाट सरत नाही
घरी लेकरे वाट पाहती
आता थकणे नाही.
काळोख्या क्षितिजावर सूर्य
पलिकडे चालला
न दिसणारा चंद्रही तिजला
तोही परका झाला.
अवचित घडला चमत्कार हा
दिसे खोपटे जवळी
फाटा ठेऊन माय पिलांना
मायेने कवळी...
ऊब घेऊनी अवघी पिल्ले
मायेला भेटावी
ओल्या फाट्यासंगे सांगा
चूल कशी पेटावी?
आग काळजातली धडधडे
कासावीस लेकरे
त्या आगीच्या झळा लागता
आग चुलीत पाझरे..
.....रत्नकान्त नाईक

Monday, 7 January 2013


दीन .....
हल्ली मी उमलणं सोडलंय. 
आधी उमलून तुझा पाठलाग करणे,
तू गेल्या दिशेने मान वळवून, 
तृषार्त नजरेने पाठलाग करणे जमत नाही मला.
पण तुझी ती सवय जायची नाही कधी.
तेंव्हाच बजावलं होतं ना, खिडकीत रोज येवू नकोस म्हणून!!
तुझ्या सावलीने बरसत राहणारा गंध,
दुरून अनुभवण्याची माझी जिद्द तुला भावला नसती.
तू केलेल्या पारिजाताच्या फुलांचा, लांबचलांब गजरा,
एक टोक तुझ्या हाती आणि  दुसरं माझ्या नाकापर्यंत, 
मी फक्त हुंगायच.
मला हात लावायला बंदी, जशी तू नजरकैद आणि  मी स्वच्छंदी...
तो शेवटचा क्षण, तुझं असह्य रुदन, आणि मजवरचा आघात;
मी अजुनही तळमळतोय तुझ्या एका कटाक्षाला, 
पण आता माझा आवाज कुणाला ऐकू येत नाही.
निपचित पडलेल्या कलेवराला आवाज नसतो.
मी तुला कधीच दिसणार नाही,
आयुष्यभर वाहतोय हा फसवणुकीचा आळ.
फक्त एकंच इच्छा, 
तू माझी आयुशाभर वाट पहावीस, वाटल्यास विश्वासघातकी म्हणावेस. 
पण, माझं हे पराधीन जगणं तुला कळू नये, 
त्यापेक्षा तुला लाभणारे अज्ञानातले सुख आणि गैरसमजातून तू मला दिलेली दुषणे, 
मी माझ्यासोबत परलोकी नेईन......
.........(रत्नकांत)

Friday, 14 December 2012


मी तुला दिसणार नाही !.
.
ऐकाया तुज काही आले, मी बोललेच नाही.
माझिया मनाचे कवडसे मी खोललेच नाही.
त्या निसटत्या पाऊली मी सावरले स्वप्न माझे,
हुरहुरत्या स्पर्शाने मी कधी खुललेच नाही.
आजवरी जे होते, माझे उरलेच नाही,
मद्याह्नीच्या काजव्यांना मी कधी भुललेच नाही. 
अंतरीची आर्त साद ना कधी तू ऐकली,
आज तुजला प्रतिसाद देण्या शब्द मी स्मरलेच नाही.
या पुढे कधीही अशी मी बेसावध असणार नाही,
पाहशी वळूनी जरी तू, मी तुला दिसणार नाही ...
मी तुला दिसणार नाही ..........
..(रत्नकांत)

Wednesday, 31 October 2012


कोणती ती परी आज अवनीवर आली, 

जादुई नगरीची स्वये सम्राज्ञी झाली,

गिरकी घेता तिच्या वदनावर रुपेरी प्रभा पसरली,

रिझविते ती सार्यांना अखंड रात्र सारी.

(अद्याक्षरे घ्या)


(को जा गि री..

Tuesday, 23 October 2012


TO ALL,
May all the tensions
in ur life burn along with the effigy of
Ravna,May you be successful and happy
ever! Happy Dussehra! RJNAIK